राज्याने एक धाडसी, स्पष्टवक्ता, नेता गमावला- धर्मरावबाबा आत्राम

राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारामतीत

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनावर गडचिरोलीत सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त करत त्यांना शब्दसुमनांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर पाठीच्या दुखण्यासाठी शस्रक्रिया झाल्याने ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते अजितदादांच्या अंतिम संस्कारासाठी जाऊ शकले नाही. मात्र चार दिवसानंतर ते बारामतीला जाऊन पवार कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कालच बारामतीसाठी रवाना झाले आहेत.

महाराष्ट्राचा आधारवड कोसळला : धर्मरावबाबा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच त्यांचे निकटवर्तीय असलेले आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना ते अत्यंत भावुक झाले. ‘आज मी माझा नेता नाही, तर माझा मोठा भाऊ आणि आधारवड गमावला आहे. अजितदादा हे केवळ एक कणखर राजकारणी नव्हते, तर ते माझ्यासारख्या आदिवासी भागातील कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मार्गदर्शक होते. ​गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि येथे रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दादांनी नेहमीच झुकते माप दिले. जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या प्रगत बनवण्याचे त्यांचे स्वप्न आता आम्हाला पूर्ण करायचे आहे. राज्याच्या राजकारणातील एक धाडसी, स्पष्टवक्ता आणि वेळेचा अत्यंत पक्का असलेला जननेता आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून काढता येणार नाही,’ अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मनाला चटका लावणारी घटना : खा.किरसान

राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने केवळ पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजितदादा हे कर्तृत्ववान, स्पष्टवक्ते, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व होते. राज्याचे सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मोलाची व निर्णायक भूमिका बजावली. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले ठोस निर्णय, मजबूत प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांची दिशा पाहिली. महाराष्ट्राने आज एक उमदा, अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असून, राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी व अपरिमित हानी झाली आहे, अशी भावना खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी व्यक्त केली.

एक तेजस्वी नेतृत्व हरपले : मा.खा.डॉ.नेते

अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी धक्का देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादा हे कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व होते. राज्याच्या विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच ठाम आणि संवेदनशील होती. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच असंख्य चाहत्यांना या भीषण दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सामान्य युवकांना संधी देणारे नेतृत्व गमावले : भरडकर

सामान्य कुटुंबातील युवकांना राजकारणात काम करण्याची संधी देत, राजकारणासोबत समाजकारणाची जाणीव रुजवणारे आणि राज्यातील विकास कामांसाठी निर्णय घेणारे कणखर नेतृत्व अजितदादा पवार आपल्यात नाहीत, ही बाब मनाला चटका लावणारी आहे. आजही या घटनेवर विश्वास बसत नाही, असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा न.प.पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी काढले. राज्यातील युवकांना दिशा देणारे, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना नेतृत्वाची संधी देणारे दादा म्हणजे उभ्या महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व होते. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते युवकांपर्यंत प्रत्येकाला आपलेपणाची वागणूक देत, विकासाला प्राधान्य देणारी राजकीय भूमिका त्यांनी कायम जपली. पक्षासाठी काम करत असतानाच समाजासाठीही योगदान देता येते, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे, तर मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि विकासाचा ध्यास असणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. असे नेतृत्व पुन्हा मिळणे कठीण आहे. त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत लिलाधर भरडकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राच्या विकासाचा एक चेहरा हरपला : ब्राह्मणवाडे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेले निधन अत्यंत वेदनादायी आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा एक प्रभावी चेहरा हरपला आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.आर.आर.पाटील असताना, गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. जिल्ह्यातील रस्ते, सिंचन तसेच इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. दादा हे कार्यकर्त्यांना जपणारे, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, विकासाभिमुख आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारा नेता गमावला असून, कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आहे, अशी भावना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली.