गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या शाळेसह बऱ्याच जिल्हा परिषद शाळेत आमदार मिलिंद नरोटे यांनी आपल्या पक्षाचे (भाजप) नाव व चिन्हासह विविध राजकीय कार्यक्रमांचे छायाचित्र असलेल्या वह्यांचे वाटप केले. हा प्रकार शाळेच्या अराजकियतेवर गदा आणून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप आझाद समाज पक्षाने केला आहे.
आझाद समाज पक्षाने यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन यासंदर्भातील पुरावे सादर केले. शाळांना भेट दिली असता काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विश्वजित कोवासे यांनीसुद्धा शाळेत असे साहित्य दिले असल्याचे पहायला मिळाले. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होत असल्याची चिंता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केली.
सरकारी शाळा ही धर्मनिरपेक्ष व अराजकीय संस्था असते. त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव, चिन्ह, प्रचार साहित्य वितरित करणे हे शालेय मूल्यधारणा व संविधानाच्या भावनांचे उल्लंघन आहे. राजकीय पक्षाचे चिन्ह, नाव आणि प्रचार साहित्य शाळेच्या परिसरात वाटणे हा कायद्याचा भंग असून, त्यामुळे आ.डॅा.मिलिंद नरोटे तसेच विश्वजीत कोवासे यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी आझाद समाज पक्षाने केली आहे.
शासन निर्णयानुसार शासकीय शाळांमध्ये केवळ शासनमान्य साहित्याचेच वाटप करता येते. असे असताना न.प.मुख्याधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. लोकशाहीत शाळा राजकीय आखाडा बनू नये, ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारांचा आम्ही निषेध करतो व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करतो, असे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी धर्मानंद मेश्राम, हंसराज उराडे, नागसेन खोब्रागडे, धनराज दामले, विवेक खोब्रागडे, सोनाक्षी लभाने, सतीश दुर्गमवार, पियुष वाकडे हे उपस्थित होते.