गडचिरोली नगर परिषदेत भाजप-राष्ट्रवादी एकत्र राहणार

नगराध्यक्षांनी घेतला पदभार

नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रणोती निंबोरकर यांना पेढा भरवताना त्यांचे यजमान सागर, सोबत सासरे अरुण निंबोरकर

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर गुरूवार, दि.8 जानेवारी रोजी नवीन नगराध्यक्षांनी सुत्रं हाती घेतली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्यासह महायुतीमधील नगरसेवकांनी वाजतगाजत नगर परिषदेत दाखल होऊन दुपारी पदभार घेतला. विशेष म्हणजे भाजपने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढली असली तरीही आता महायुती म्हणूनच आम्ही सत्तेत राहू, असे भाजपचे निवडणूक प्रभारी आणि चिमुरचे आमदार बंटी भांगडिया यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

डोक्यावर फेटे चढवून नगराध्यक्षांसह भाजपच्या 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 अशा 20 नगरसेवकांचे धानोरा रोड ते नगराध्यक्षांच्या कक्षापर्यंत ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. यावेळी निवडणूक प्रभारी बंटी भांगडिया, माजी खासदार तथा पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे, ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी अध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, महिला प्रदेश सचिव रेखा डोळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्य तथा नगरसेवक लिलाधर भरडकर, ज्येष्ठ कंत्राटदार अरुण निंबोरकर, युवा नेते सागर निंबोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचे स्वागत करत त्यांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले. कार्यालयीन सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. व्यापारी असोसिएशनकडून मनोज देवकुले, गुरूदेव हरडे, रवि चन्नावार यांनी नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

नगराध्यक्षपद हे केवळ प्रतिष्ठेचे पद नसून ती एक जबाबदारी आहे आणि ती मी चांगल्या पद्धतीने निभावणार, असा विश्वास यावेळी प्रणोती निंबोरकर यांनी व्यक्त केला. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या बैठकीत न.प.उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतरच्या सभेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड होईल. त्यावर कोणाकोणाची वर्णी लागते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.