आमचे सरकार आल्यास रिक्त असलेली अडीच लाख सरकारी पदे भरणार

जाहीर सभेत प्रियंका गांधींचे आश्वासन

देसाईगंज : महाराष्ट्रात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती केली जात आहे. त्यामुळे नैराश्यातून सर्वात जास्त तरुणांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. पण आमचे सरकार सत्तेत आल्यास सर्व रिक्त पदांची भरती करणार, असे आश्वासन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देसाईगंज येथील जाहीर सभेत दिले.

या सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेष बघेल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार डॅा.नामदेव किरसान, प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेनेचे सुरेंद्रसिंह चंदेल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रियंका गांधी यांनी सरकारवर टिका करताना यांच्या राजवटीत शेतकरी, कामगार, महिला, तरुण कोणीही सुरक्षित नाही. फक्त उद्योगपती गौतम अदानीच सुरक्षित आहेत, अशी टिका केली. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाचे हित पाहून मोठ्या संस्था, करखाने, बंदरे, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स अशा सुविधा विविध राज्यात उभ्या केल्या. विकासाच्या कामात काँग्रेस सरकारने कधीच भेदभाव केला नाही. परंतु मागील 11 वर्षांपासून देशात भेदभावाचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात येणारे मोठे प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवून महाराष्ट्राशी भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील सर्व विमानतळ, बंदरे, कारखाने, जमीन एकाच उद्योगपतीला दिली आहेत. शेतकरी संकटात आहे, त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही आणि शेती साहित्यावर मात्र जीएसटी लावून शेतकऱ्याला लुटले जात आहे.

आदिवासांचे हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेस सरकारने पेसा कायदा बनवला. पण हा कायदाही खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात 4 लाख आदिवासींनी जमिनीच्या पट्ट्यांसाठी अर्ज केले, त्यातील 2 लाख बाद करण्यात आल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मार्गदर्शन केले.