गडचिरोली : लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) दुसरी जनकल्याण सभा आज देसाईगंज (वडसा) येथे होत आहे. पक्षाचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्ह्यात ‘स्वबळा’ची चाचपणी सुरू केली आहे. 12 ऑक्टोबरच्या चामोर्शी येथील पहिल्या सभेत धर्मरावबाबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. आजच्या सभेत ते आपली भूमिका आणखी स्पष्ट करण्याची शक्यता असल्याने राजकीय मंडळींचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

देसाईगंज येथील तालुका क्रीडा मैदानावर दुपारी 12 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ व आजी-माजी पदाधिकारी तसेच सिनेअभिनेत्री माधुरी पवार या सभेला उपस्थित राहणार आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच पंचायत समित्यांमधील आरक्षण जाहीर होताच, आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या राजकीय हालचालींना वेग दिला आहे. 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी सहपालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते ॲड.आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा साधत ते आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी भाजपवर टिकास्र सोडल्याने स्थानिक निवडणुकांसाठी महायुतीतून फारकत घेत असल्याचे संकेत दिले आहे. चामोर्शीतील सभेनंतर आता सर्वांचे लक्ष 26 ऑक्टोबरच्या देसाईगंज येथील सभेकडे लागले आहे.
































