‘आयारामां’पेक्षा स्वपक्षीय लोकांना तिकिट वाटपात प्राधान्य देणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माहिती

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत तीन-तीन पक्षांच्या युती आणि आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल. काही लोक मनसेकडे येऊ शकतात. पण मनसे आयारामांपेक्षा स्वपक्षीय लोकांनाच प्राधान्य देईल, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गडचिरोलीत पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना दिली. गडचिरोलीतील भाजपचे काही पदाधिकारी मनसेच्या तिकीटवर लढणार असल्याच्या चर्चेबद्दल त्यांनी अनभिज्ञता दर्शवत अशी काही शक्यता फेटाळून लावली.

राज ठाकरे यांनी गुरूवारी गोंदिया-भंडाऱ्यानंतर गडचिरोलीत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. विश्राम भवनात या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप केला. यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश हे मतदारांनी त्यांना दिलेली पसंती नव्हती, तर केंद्र सरकारवरचा राग होता. लोकांना महायुती किंवा महाविकास आघाडी सोडून सक्षम पर्याय हवा आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात किंवा विदर्भात मनसे विधानसभेच्या किती जागा लढविणार याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगणे टाळले.

गडचिरोली जिल्ह्यात मनसेचे संघटन का नाही याबद्दल त्यांना छेडले असता याबद्दली माहिती मी घेत असून ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना बदलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. लाडकी बहिण, लाडका भाऊ अशा योजनांमुळे लोक आपले मत बदलवत नाहीत. त्यांना ज्यांना द्यायचे त्यांनाच ते देतील. त्यामुळे अशा योजनांचा महायुतीला फारसा फायदा होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली.

इंदिरा गांधी चौकात स्वागत

दरम्यान भंडारा जिल्ह्यातून राज ठाकरे यांचे गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आणि आतिषबाजी करत त्यांचे स्वागत केले. विश्राम भवनात आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या पथकाने आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बंदद्वार बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते.