गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांसह राज्यभरात सर्वच पक्षांमध्ये बंडखोरांची संख्या यावेळी वाढली आहे. काँग्रेस पक्षाच्या बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी त्यांची समजूत काढली जाईल. त्यानंतरही त्यांनी ऐकले नाही तर त्यांना पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. गडचिरोली विधानसभा मतदार संघातील
महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या प्रचारासाठी आयोजित नियोजन बैठकीनंतर ना.वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपवाले कुणबी आणि तेल्यांपासून काँग्रेसला वाचवा, असं खोटं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष सच्चा आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे मनोहर पोरेटी यांच्या उमेदवारीने दाखवून दिले आहे. सरकारने
पुन्हा दोन लाख कंत्राटी पदभरती करण्याचा निर्णय घेऊन हे सरकार बहुजनांच्या हितासाठी काम करणारे नसल्याचे दाखवून दिले. निवडणूक आयोगाचा आधार घेऊन लाडकी बहिण योजना बंद केली. वास्तविक भ्रष्टाचार कमी केला तर लाडक्या बहिणींना दिड नाही तर अडीच हजारही देणे शक्य आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर हे करून दाखवू असेही ना.वडेट्टीवार म्हणाले.
डॅा.नरोटेंना हवे होते काँग्रेसचे तिकीट?
भाजपचे विद्यमान उमेदवार मिलिंद नरोटे हे मला भेटायला येऊन गेले होते. एवढेच नाही तर डॅा.देवराव होळी यांनीही काही लोकांकडे संपर्क केल्याची माहिती कळली, असा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाची संधी आहे हे पाहूनच त्या घडामोडी घडल्या असाव्यात, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
लोकसभेपेक्षा चांगली स्थिती
यावेळी खासदार डॅा.नामदेव किरसान आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आम्ही कोणत्याही गटबाजीला थारा न देता एकनिष्ठपणे काम करणार असल्याचे सांगितले. लोकसभेपेक्षा विधानसभेत स्थिती चांगली आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस उमेदवाराचे मताधिक्य वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.