जिल्ह्यातील नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर, 7 ठिकाणी महिलाराज

12 पैकी केवळ एक एसटीसाठी राखीव

गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांसह नऊ नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी (दि.6) मुंबईत जाहीर करण्यात आले. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरासाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नगर परिषदांसह नगर पंचायती मिळून 12 नगराध्यक्षांपैकी 7 ठिकाणी महिलाराज राहणार आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जमातीसाठी राखीव केवळ एकच अध्यक्षपद ठेवण्यात आले आहे.

गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषदांच्या निवडणुकीची अधिसूचना दिवाळीनंतर लगेच काढली जाण्याची शक्यता आहे. नगर पंचायतींचा कार्यकाळ संपण्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांना आतापासून मोर्चेबांधणी करणे शक्य होणार आहे.

असे आहे नगराध्यक्षांचे आरक्षण

गडचिरोली – खुला महिला प्रवर्ग , देसाईगंज – ओबीसी महिला, आरमोरी – अनुसूचित जाती, नगर पंचायतींमध्ये अहेरी, कोरची आणि धानोरा – अनुसूचित जाती महिला, सिरोंचा- अनुसूचित जमाती महिला, एटापल्ली – नागरिकांचा मागास प्रवर्ग, भामरागड – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मुलचेरा आणि चामोर्शी- खुला प्रवर्ग, कुरखेडा- अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव.

विशेष म्हणजे आदिवासीबहुल असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात 12 पैकी केवळ सिरोंचा या एकाच ठिकाणी नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. अशावेळी योग्य उमेदवाराला संधी देताना प्रमुख राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.