कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण निघणार

सोडत काढण्यासाठी 22 ला सभा

गडचिरोली : येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे सन 2025 ते 2030 करिता आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या 22 एप्रिल रोजी सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी दि.22 ला दुपारी 1 वाजता पोटेगाव रोडवरील गोंडवाना कला दालनात सभा होणार आहे.

सदर आरक्षण सोडत सभेत गडचिरोली तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 34 ग्रापंचायतींकरिता सरपंचपदाचे आरक्षण, तसेच अनुसूचित क्षेत्रातील 17 ग्रामपंचायतींच्या महिलांकरिता सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे.

या आरक्षण सोडत सभेला गडचिरोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, गडचिरोली यांनी केले आहे.