Home राजकीय घडामोडी सिरोंचात पं.दीनदयाळ प्रशिक्षण महाभियानांतर्गत निवासी कार्यशाळा

सिरोंचात पं.दीनदयाळ प्रशिक्षण महाभियानांतर्गत निवासी कार्यशाळा

योजना जनतेपर्यंत पोहोचवा- डॉ.उसेंडी

गडचिरोली : भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026’ अंतर्गत क्रीडा संकुल सिरोंचा येथे दि.7 व 8 एप्रिल असे दोन दिवस भाजपा पदाधिकाऱ्यांची निवासी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

डॉ.उसेंडी यांनी सरकारची कामगिरी आणि सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकला. कार्यकर्त्यांना सरकारच्या योजनांना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रेरित केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय सिद्धांतांवर चर्चा करण्यात आली. सरकारच्या जनहितकारी योजनांची माहिती देऊन कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी भाजपचा इतिहास व विकास, वैचारिक अधिष्ठान, कार्यपद्धती, कार्यविस्तार, आमची दृष्टी, सरकारच्या उपलब्धी व अंमलबजावणी, तसेच बुथ व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांचे नेतृत्व कौशल्य, संघटन कौशल्य आणि समाजसुधारणेची बांधिलकी अधिक दृढ करण्यासोबत स्थानिक पातळीवर सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविण्याची क्षमता वाढण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘एकात्म मानववाद’ या विचारधारेवर आधारित सेवा, समर्पण आणि राष्ट्रहित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून त्या विचारांना अधिक बळ देत देशभरातील कार्यकर्त्यांना वैचारिक व संघटनात्मक बळ मिळावे, या उद्देशाने हे प्रशिक्षण महाभियान राबविण्यात येत आहे.

माजी पालकमंत्र्यांचेही मार्गदर्शन

यावेळी माजी पालकमंत्री अंब्रिशराव महाराज आत्राम यांनी पक्षाचा इतिहास, पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसेवेची भूमिका यावर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना पक्षाच्या मूलभूत मूल्यांवर दृढ राहून जनसेवेचे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर आणि सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांवर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी युवा नेते अवधेशबाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते सत्यम मनचर्लावार, सिरोंचा भाजपा तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत, माजी तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, जेष्ट नेते दामोधर अरगेला, डॉ.श्रीकांत सुगरवार, संतोष पडाला, किरण कुलसंगे, शहराध्यक्ष शरीख शेख यांच्यासह भाजपाचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.