कोरची तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट, अनेकांचा पक्षप्रवेश

ग्रामीण भागात वाढले भाजपचे वलय

कोरची : ‘सबका साथ सबका विकास’ या मुलमंत्रावर चालणाऱ्या भारतीय जनता पक्षावर ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येयधोरण आणि धडक कामे करण्याच्या पद्धतीने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला साथ देण्याचा निर्धार केला आहे. देसाईगंज येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात अनेकांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षांसाठी काम करणाऱ्या कोरची तालुक्यातील बेडगाव, गॅरापत्ती, प्रतापगड व इतर गाव परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी आ.कृ्ष्णा गजबे यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, विधानसभा समन्व्यक किसन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपचे विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, विधानसभा समन्वय किशन नागदेवे, भाजपचे महामंत्री सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी आदी उपस्थित होते.