मुलचेरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या शिवसंपर्क भगवा सप्ताह अभियानात मुलचेरा येथे झालेल्या कार्यक्रमात शेकडो शिवसैनिकांनी शिवबंधन बांधून घेतले. पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या नेतृत्वात हे शिवसंपर्क अभियान सुरू आहे.
मुलचेरा येथे तालुका प्रमुख समर मुखर्जी यांच्या नेतृत्वात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून हे अभियान सुरू झाले. यावेळी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभियानादरम्यान यांनी 14 आॅगस्टपर्यंत आपल्या घरांवर व प्रत्येक खेड्यापाड्यात भगवा ध्वज तसेच घरामध्ये मशालीचा फोटो लावावा, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवबंधन कार्यक्रम घ्यावे, तसेच विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर, मतदार नोंदणी अभियान, गरजूंना शालेय साहित्य वाटप, शेतकरी बंधू-भगिनींना रेनकोट वाटप, पावसाळ्यातील आजारांविषयी जनजागृती, स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक एटापल्लीचे युवासेना तालुका प्रमुख अक्षय पुंगाटी यांनी केले. महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका करुणा जोशी यांनी, शिवसेना तालुकाप्रमुख समर मुखर्जी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सिरोंचा तालुकाप्रमुख रघुनंदन जाडी, सिरोंचा तालुका संघटक दुर्गेश तोकला, एटापल्लीचे नामदेव हिचामी, पुष्पश्री मुखर्जी, टीना रॅाय, अरुणा निकोडे, नक्कीर शेख, इब्राहिम शेख, रंजीत लेकामी, विशाल मेश्राम, अमर भक्त, महादेव सरकार, अविनाश दास, चंदन शील, प्रसेनजीत चक्रवर्ती आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.