शिवसेना नेत्याच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

स्थानिक समस्या व कार्यपद्धतीवर मंथन!

गडचिरोली : राज्यमंत्री, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री तथा शिवसेना नेते अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे पार पडली. ही बैठक परस्पर सुसंवाद, संघटनबांधणी व कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले जाते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर, स्थानिक अडचणींवर आणि कार्यपद्धतीच्या अनुषंगाने साधक-बाधक चर्चा झाली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडत समस्या मांडल्या, तसेच त्या समस्यांच्या निराकरणासाठी ना.जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजनांची हमी दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या महत्वपूर्ण बैठकीला प्रामुख्याने आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉ.नितीन कोडवते व डॉ.चंदा कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.विजय चाटे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.