शिवसेना पदाधिकारी म्हणतात, तर जनता हे सहन करणार नाही

गडचिरोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नागपूर येथील जाहीर सभेनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचे पोस्टर फाडणे, जाळणे अशा कृत्यातून आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यातून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांचा अपमान केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. शिवाय भाजपने सुरू केलेले जोड-तोडचे राजकारण जनता सहन करणार नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

येथील प्रेस क्लब भवनात पक्षाचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, उपजिल्हा प्रमुख सुनील पोरेड्डीवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, माजी जिल्हाप्रमुख विजय श्रृंगारपवार आदींनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. भाजपकडून ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा वापर केवळ विरोधी पक्षाच्या लोकांवर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, असा हा प्रकार आहे. यांच्यात नैतिकता नसून लोकशाहीला संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला. पावसाळ्यानंतर पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यात दौरा होईल. पक्ष बांधणीच्या कामात कुठेही हयगय होत नसून जिल्ह्यातील कार्यकर्त्यात आम्ही नवचैतन्य आणू, असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेला विधानसभा समन्वयक राजेंद्र लांजेकर, संघटक नंदू कुमरे, संघटक घनश्याम कोलते, तालुका प्रमुख अनिल कोठारे, माजी उपजिल्हा प्रमुख राजू अंबानी, माजी तालुका प्रमुख महेंद्र शेंडे, प्रितेश अंबादे, विलास दाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.