गडचिरोली : भारतीय जनता पक्षाने सर्वच समाजघटकांना योग्य न्याय देत त्यांचा सन्मान केला आहे. आता केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपच्या नेतृत्वातील सरकार असल्यास विकास कामांना गती येईल. आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी राज्याला सढळ हाताने दिले आहे. त्यांचा योग्य सन्मान करत मतदार भाजपच्या नेतृत्वातील सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर बसवेल, असा विश्वास भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी व्यक्त केला. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या जाहीर प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
येथील शिवाजी कॅालेजच्या मैदानावर झालेल्या या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे त्यांच्याऐवजी भाजप नेत्या स्मृती ईराणी गडचिरोलीत दाखल झाल्या. या सभेला गडचिरोली मतदार संघातील महिलांनी लक्षणीय गर्दी केली होती.
यावेळी स्मृती ईराणी म्हणाल्या, गेल्या 10 वर्षात केंद्राने आणि राज्यातील युती सरकारने अनेक योजनांच्या माध्यमातून सर्व घटकांचा सन्मान केला. महिलांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये सन्मान निधी दिला जाईल. शेतकऱ्यांच्या सन्मान निधीतही वाढ होणार आहे. आदिवासी समाजाचे लढवय्ये बिरसा मुंडा यांच्यावर केंद्र सरकारने टपाल तिकिट काढले. आदिवासी जनजाती दिन जाहीर केला. द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने आदिवासी समाजाला पहिल्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याचा सन्मान दिला. सामान्य प्रवर्गातील गरीब लोकांना 10 टक्के आरक्षण दिले. बसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिली. गोरगरीबांना फुकट अन्नधान्य दिले जात आहे. काँग्रेसच्या काळात आदिवासींच्या विकासासाठी 25 हजार कोटींचे बजेट दिले जात होते. मोदी सरकारने हे बजेट पाच पट जास्त वाढवले. एवढेच नाही तर डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील घर विकत घेऊन त्याचे स्मारकात रुपांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आता भाजपच्या लाडकी बहिण योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून काँग्रेसला या बहिणी आठवल्या. पण त्यांचे हे बहिणप्रेम बेगडी आहे. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तिथे कुठेही त्यांनी महिलांना असा सन्मान निधी दिला नाही. पण महाराष्ट्रातील महिलांना 3 हजार रुपये देण्याच्या वल्गना करत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगत महायुतीचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांनाच जिंकून आणा, असे आवाहन केले.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खा.अशोक नेते, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र ओल्लालवार, महामंत्री प्रकाश गेडाम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, रिपाइं आठवले गटाचे मेघराज घुटके, प्रदेश महिला भाजपच्या सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गिता हिंगे, माजी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, हेमंत राठी, मुक्तेश्वर काटवे, दीपक हलदार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॅा.चंदा कोडवते यांनी केले.
सर्वांगिन विकासासाठी कटीबध्द- डॉ.नरोटे
महायुतीचे सरकार गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगिन विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. महायुतीच्या काळात जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ, रेल्वेमार्गाच्या कामाला सुरूवात, मेडिकल कॅालेजची सुरूवात अशी अनेक कामे झाली आहेत. सरकारने लाडकी बहिण योजना राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यातील जनतेच्या सर्वांगिन विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द आहे, असे महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले.