
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात भाजप प्रदेश अनुसूचित जनजाती मोर्चाची महत्वाची बैठक 12 ऑगस्टला संपन्न झाली. या बैठकीत अनुसूचित जमातीसमोरील विविध अडचणी, समस्या आणि त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा व मंथन करण्यात आले.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी व हितासाठी सखोल मार्गदर्शन केले. यासोबतच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने राष्ट्रीय महामंत्री (अनु.जनजाती मोर्चा) तथा आमदार हरिश्चंद्र भोये, भाजपचे प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर, तसेच प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे, एन.डी.गावित, गडचिरोली जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, माजी आमदार डॉ.देवराव होळी, वैभव पिचड, श्रीप्रभुदास भिलावेकर, माजी महापौर माया ईवनाते, राजे विरेनशाहा उईके, रमेश मावसकर, अक्षय उईके, आदिवासी मोर्चाचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांना वरिष्ठ नेत्यांनी संयमपूर्वक ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. बैठकीच्या शेवटी अनुसूचित जनजाती समाजाच्या विकासासाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी भाजप वचनबद्ध असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.