गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी पदभार घेतल्यानंतर नगर परिषदेची पहिलीच बैठक आज (दि.15) दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीत नगर परिषद उपाध्यक्षाच्या निवडीसह 3 स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यात कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या जवळच्या लोकांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
नगर परिषदेच्या 27 नगरसेवकांपैकी 15 जण भाजपचे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचेही 5 नगरसेवक सत्तारूढ पक्षासोबत आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्य म्हणून भाजपच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याला संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून भाजपने चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यांनी आमदार डॅा.नरोटे यांच्या जवळच्या लोकांना संधी नाकारल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत नगरसेवक म्हणून कोणाची लॅाटरी लागणार आणि न.प.उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
































