
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली शहर मंडळाच्या वतीने आयोजित पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान –2026 या दोन दिवसीय शिबिराचा शुभारंभ येथील नगर परिषदेच्या नगर भवनात शनिवारी (दि.28) उत्साहात करण्यात आला. या प्रशिक्षण महाअभियानाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी मंचावर आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती सागर निंबोरकर, भाजप शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, महामंत्री गोविंद सारडा, सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, शिक्षण सभापती हर्षल गेडाम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरूवातीला पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम् आणि भाजपाचे सामूहिक गीत गात प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणभावाने काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी संघटनात्मक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, गरीब कल्याण अन्नधान्य योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, मुद्रा योजना यांसह विविध योजनांमुळे समाजातील शेतकरी, महिला, गरीब आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांमुळे गरजू नागरिकांना आधार मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील स्वच्छता, पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा यामध्ये झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढवण्याचे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.अशोक नेते यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले, भाजप युवा मोर्चापासून सुरू झालेला प्रवास संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत पुढे गेला. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने काम करताना प्रदेशाध्यक्ष म्हणून तीन वेळा जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे 10 वर्ष प्रतिनिधीत्व करताना अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यात यश आल्याचे ते म्हणाले.
अशी होती कार्यक्रमाची रूपरेषा
दि.28 मार्च रोजी उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवरील सत्रे घेण्यात आली. प्रथम सत्र “वैचारिक अधिष्ठान” या विषयावर रमेश भुरसे यांनी संघटनेच्या वैचारिकतेवर सविस्तर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात “सरकारची कामगिरी व अंमलबजावणी” या विषयावर मा.खा.डॉ. अशोक नेते यांनी सविस्तर विवेचन केले. तृतीय सत्रात आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी बुथ व्यवस्थापन, “मन की बात” व आगामी कार्यक्रमांची माहिती दिल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
आज दि.29 मार्च रोजी इतर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षण महाअभियानातून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि जनसंपर्क कौशल्य याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले जात आहे.
































