

गडचिरोली : दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना गुरुवारी संध्याकाळी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी खुल्या सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेतून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्यासह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांचे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील योगदान सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर इंदिरा गांधी चौकात मेणबत्त्या प्रज्वलित करून दादांचा जयघोष करण्यात आला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती लिलाभर भरडकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गडचिरोलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा.खा.नेते म्हणाले “राज्याच्या सर्वांगीण विकासात अजितदादांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतली. सामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती त्यांची भूमिका नेहमीच ठाम व संवेदनशील राहिली. जिल्ह्यात आपल्या प्रस्तावानुसार तत्कालीन पाटबंधारे मंत्री असलेल्या अजितदादांनी वैनगंगा नदीवरील बॅरेज मंजूर करण्यासाठी दिलेल्या योगदानाची मा.खा.नेते यांनी आठवण करून दिली.
या श्रद्धांजली शोकसभेत आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती निंबोरकर, प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित कोवासे, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, आझाद पार्टीचे राज बन्सोड, शेकापचे रामदास जराते, बाळू टेंभुर्णे, रिपब्लिकन पार्टीचे नेते रोहीदास राऊत, माजी न.प.सभापती विजय गोरडवार, भाजप किसान मोर्चाचे सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, अल्पसंख्याक आघाडीचे नेते बब्बलू हुसैनी, नगरसेविका वर्षा शेडमाके, अॅड.कविता मोहरकर, अमिता मडावी, कुसूम अलाम यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून स्व.अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
































