योगिता पिपरेंसह भाजपच्या दोन माजी नगराध्यक्षांची माघार

आज बावनकुळेंच्या हस्ते प्रचारारंभ

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचा अर्ज सादर करताना योगिता पिपरे, सोबत प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे.

गडचिरोली : गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे आणि देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते या दोन भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून माघार घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची वाट मोकळी करून दिली. आता नगराध्यक्षपदासाठी गडचिरोलीत 7, देसाईगंजमध्ये 6, तर आरमोरीत 10 जण निवडणूक रिंगणात आहेत.

दरम्यान भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. यावेळी ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करतील.

बावनकुळे सकाळी 11.30 वाजता हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत येतील. 11.45 वाजता चामोर्शी रोडवरील भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर हेलिकॅाप्टरने गोंदियासाठी रवाना होतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेसु्द्धा आज गडचिरोलीत येत आहेत. ते सकाळी 9.30 वाजता कारने गोंडवाना विद्यापीठात येतील. दुपारी 1 वाजता ते कारने नागपूरकडे रवाना होतील.

पिपरे यांचे पक्षनिष्ठा व शिस्तीला प्राधान्य

पक्षावर असलेली निष्ठा, भाजपच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास आणि पक्षशिस्तीला सर्वोच्च स्थान देत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे योगिता पिपरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले. मात्र प्रभाग क्र.3 (ब)- इंदिरानगर, स्नेहनगर येथून त्या नगरसेवकपदाची निवडणूक भाजपच्या उमेदवार म्हणून लढत आहे.

नामांकन अर्ज मागे घेताना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, लोकसभा समन्वयक बाबुराव कोहळे, नगर परिषद निवडणूक प्रभारी वैभव पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पिपरे यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळवत नगरसेवक म्हणून आपण बहुमताने निवडून येऊ, असा विश्वासही पिपरे यांनी व्यक्त केला.