अहेरीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

आ.डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांचा धडाका

अहेरी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचा धडाका सुरू केला आहे. रविवारी (दि.15) दिवसभर धर्मरावबाबा या कामात व्यस्त होते.

याप्रसंगी अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, सुरेंद्र अलोणे, इशाक शेख, जावेद अली, नगरसेवक विलास सिडाम, नगरसेविका नौरास शेख, ज्योती सडमेक, अजय सडमेक, पितांबर कुळमेथे, योगेश दंडिकवार, आदित्य पुसलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (अधिक बातमी खाली वाचा)

प्रथमतः अहेरी-वांगेपली ॲप्रोच रोडचे आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकार्पण केले. त्यानंतर तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील वांगेपली येथे गेरा फाट्याला जोडणाऱ्या बायपास रोडचे भूमिपूजन केले.
तसेच अहेरी नगर पंचायतअंतर्गत प्रभू सदन कॉलनीतील सी.सी.रोडचे, लोहार समाजाचे समाज मंदिर, बेघर कॉलनीतील समाज मंदिराचे भूमिपजून करण्यात आले.

पॉवर हाऊस कॉलनी येथे आदिवासी समाजाच्या समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश

अहेरी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यादरम्यान चर्च परिसरात डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी धर्मरावबाबा म्हणाले, मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन, अर्थात प्राणवायू लागतो. हा ऑक्सिजन झाडांपासून मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावून झाडे जगवावे, आणि पर्यावरणाचा समतोल राखावा, असा संदेश दिला.