सत्तेची चावी विदर्भाकडे देण्यासाठी मनोहर पोरेटींना विधानसभेत पाठवा

ना.वडेट्टीवार यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

गडचिरोली : मनोहर पोरटीसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी सर्वांनी कामाला लागावे. राज्याच्या सत्तेची चावी विदर्भाकडे देण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे (काँग्रेसचे) उमेदवार मनोहर पोरेटी यांच्या प्रचार कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.

यावेळी मंचावर उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यासह खासदार डॅा.नामदेव किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अॅड.राम मेश्राम, प्रा.राजू कात्रटवार, पंकज गुड्डेवार, प्रभाकर वासेकर, हसनअली गिलानी, समशेरखाँ पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.वडेट्टीवार म्हणाले, काही मुठभर लोक समाजात भांडणं लावून सत्तेची पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात सर्वाधिक मरण ओबीसी समाजाचे होत आहे. जागरूक राहून काम करा. आज तुमच्या हातून घडलेल्या चुकांचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील. ती पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.

रात्री 10 वाजता ना.वडेट्टीवार यांनी पोरेटी यांच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली. एवढ्या उशिरापर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंडपात असल्याचे पाहून ना.वडेट्टीवार यांनी पोरेटी यांच्या विजयाची खात्री दिली. पोरेटी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयात सकारात्मक ऊर्जा मिळते. विजयासाठी ही ऊर्जा गरजेची असते, असे म्हणून त्यांनी पोरेटी यांचा विजय निश्चित असल्याचे ठामपणे सांगितले.