लोकसभेनंतर विधानसभेतही ‘वंचित’ला सूर गवसेना, अस्तित्व टिकवण्याचे आव्हान

पक्षबांधणीच नसल्याने कार्यकर्ते मिळेना

गडचिरोली : पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून दारूण पराभवाचा सामना कराव्या लागलेला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष पुन्हा एकदा विधानसभेत आपले अस्तित्व पणाला लावणार आहे. पण जिल्ह्यात कुठेही कार्यकर्ता बांधणी, पक्ष संघटन मजबूत नसताना केवळ उमेदवार उभे करण्याचा हा प्रकार कशासाठी हे मतदारांनी वेळीच ओळखल्याने यावेळीसुद्धा वंचितची स्थिती लोकसभेपेक्षा वेगळी नसेल, असे जाणकार सांगतात.

लोकसभा निवडणुकीत अनेक दिवस महाविकास आघाडीत येण्यावरून वंचितचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. अखेर त्यांनी महाविकास आघाडीसोबत जुळवून न घेता अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले. पण वंचितला मत म्हणजे केवळ मतांचे विभाजन करणे असून त्याचा फायदा आपल्या विचारधारेशी न जुळणाऱ्या उमेदवाराला होतो हे आंबेडकरी जनतेने ओळखून वंचितला बाजुला सारले. त्यामुळे निवडून येणे दूरच, मत विभाजनसुद्धा होऊ न देता मतदारांनी वंचितला मतांपासून ‘वंचित’ ठेवले. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी गडचिरोलीत जाहीर सभा घेतली होती, मात्र उमेदवाराला डिपॅाझिटही वाचवता आले नाही.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर तरी हा पक्ष संघटनबांधणी करून पक्षाची ताकद वाढवेल, असे अपेक्षित असताना काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाची वाट लावली. त्यामुळे या पक्षाची स्थिती लोकसभेपेक्षाही हलाखीची झाल्याचे दिसून जाते. अशा स्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.