गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये यावेळी निवडणूक लढू ईच्छिणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अनेकांनी अपक्ष नामांकन भरून आपल्या मनातील खदखदीला वाट करून दिली. परंतू गेल्या चार दिवसात त्यांचे बंड थंड करण्यात पक्षाच्या नेत्यांना किती यश आले हे उद्या (सोमवारी) संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी संपणार आहे.
बंडखोर आणि प्रमुख अपक्ष उमेदवारांमध्ये गडचिरोलीतून भाजपचे डॅा.देवराव होळी, काँग्रेसचे विश्वजित मारोतराव कोवासे, अहेरीतून काँग्रेसचे हनमंतू मडावी, माजी आमदार दीपक आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे माजी आ.आनंदराव गेडाम, वामन सावसाकडे, प्रशासकीय सेवेत असलेल्या माधुरी मडावी यांचा समावेश आहे. ते निवडणुकीतून माघार घेणार की लढण्याचा निर्णय कायम ठेवणार याची उत्सुकता सर्वाना आहे.
भाजपचे संदीप कोरेत हे मनसेच्या इंजिनावर स्वार झाले आहेत. त्यांची रेल्वेगाडी कुठपर्यंत धावते याकडेही अहेरी क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. याशिवाय गडचिरोलीतून काँग्रेसच्या डॅा.सोनल कोवे, आरमोरीतून डॅा.शिलू चिमुरकर यासुद्धा आपले नशिब आजमावून पाहात आहेत. नामांकन वैध ठरलेल्या 40 जणांपैकी आता कोण-कोण माघार घेणार याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहे.