गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने धर्मरावबाबांना मदत केली असती, तर माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी बंडखोरी करत धर्मरावबाबांच्या विरोधात निवडणूक लढली असताना अम्ब्रिशराव यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी पक्षातून निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई का केली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी चामोर्शीच्या जाहीर सभेत भाजपने आपल्याला पाडण्यासाठी पुतणे अम्ब्रिशराव यांना मदत केल्याचा आरोप केला होता. त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन तो आरोप खोडून काढताना आम्ही महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठीच काम केले असून त्यांच्या विजयात आमचाही वाटा असल्याचे म्हटले होते. मात्र त्यावर पलटवार करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी भाजपने विधानसभा निवडणुकीत युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला. भाजपने अम्ब्रिशराव आत्राम यांना निवडणुकीत पाठबळ दिले नसते तर त्यांच्यावर कारवाई केली असती, असा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसना ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली असताना देखील महायुतीमध्ये गडचिरोली-चिमूर हे लोकसभा क्षेत्र भाजपच्या वाट्याला गेल्याने महायुतीचा धर्म पाळत बाबांनी भाजप-महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. आॅपरेशन झाले असताना सुद्धा बाबांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी तब्बल 67 सभा घेतल्याचे यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पत्रपरिषदेला माजी आमदार डॅा.रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी जि.प.उपाध्यक्ष डॅा.तामदेव दुधबळे, ऋषीकांत पापडकर, विवेक बाबनवाडे, अमोल कुळमेथे, लौकिक भिवापुरे, चिनी मोटवानी, अमिन लालानी, किशोर तलमले, योगेश नंदगाये, सुनील नंदनवार, प्रदीप वडेट्टीवार, गिरीष खाडिलकर, सुषमा येवले, बळवंत येवले, किशोर बावने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.












