गडचिरोली : रक्षाबंधनाच्या निमित्ताने माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या गडचिरोलीतील निवासी कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्या असलेल्या अनेक महिलांनी नेते यांना राख्या बांधत औक्षण केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फॅार्म भरून देण्यासाठी मा.खा.नेते यांनी सर्वप्रथम गडचिरोली आणि चामोर्शी येथे सुविधा व्यवस्था करून शेकडो महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्याचे ऋण म्हणून महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपली भावना व्यक्त केली.
याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी मा.खा.नेते यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले.
महिला भगिनींना या योजनेचे फॉर्म भरताना त्रास होऊ नये मा.खा.नेते यांनी यासाठी गडचिरोली व चामोर्शी या ठिकाणच्या आपल्या कार्यालयात व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेक महिला योजनेसाठी पात्र होऊन त्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या महिलांनी राख्या बांधुन माजी खासदार अशोक नेते यांचे आभार मानले. अनेक लाडक्या बहिणींनी अशोकभाऊंमुळे आम्हाला या योजनेचे पैसे मिळाल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेनेच्या नीता वडेट्टीवार, महिला जिल्हाप्रमुख (मागासवर्गीय विभाग), किरण राठोड, कांता म्याकलवार, कांता येरणे, बबिता गौतम, अर्चना चन्नावार, अर्चना गोरघटे, माधुरी घुगरे इत्यादी अनेक महिला उपस्थित होत्या.