गडचिरोली विधानसभेत काँग्रेसचे तिकीट युवक काँग्रेसच्या कोट्यातून द्या

आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी

गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसची तिकिट युवक काँग्रेसच्या कोट्यातून द्यावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव तथा विदर्भ झोनचे प्रभारी सय्यद अहमद खालीज यांच्याकडे केली. त्यावर खालीज यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे ही मागणी लावून धरण्याचे आश्वासन युकाँच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक सर्किट हाऊसला झाली. त्यात या मागणीने जोर पकडला. यावेळी नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान, युवक काँग्रेसचे सचिव तथा विदर्भ झोनचे प्रभारी सय्यद अहमद खालीज, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अॅड.विश्वजीत मारोतराव कोवासे, सचिव अतुल मल्लेलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांचा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे सामूहिक सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये ‘चलो पंचायत, चलो वार्ड’ अभियानाच्या माध्यमातून लाडकी बहिण योजना, नवमतदार नोंदणी अशा विविध शासनाच्या योजना प्रत्येक जनमाणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम युवक काँग्रेसने करावे, अशा सूचना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, कर्नाटकचे सोशल मिडिया इन्चार्ज ज्योतिष होनहल्ली, रिजवान शेख, आसिफ शेख, वसंत पाटील राऊत, शंकरराव सालोटकर यांच्यासह जिल्हाभरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.