Home महिला विश्व कोनसरी गावातील 19 महिला चालविणार चारचाकी वाहन

कोनसरी गावातील 19 महिला चालविणार चारचाकी वाहन

छिंदवाड्यात घेणार प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थी महिलांच्या बसला हिरवी झेंडी दाखविताना सरपंच पावडे आणि लॅायड्सचे अधिकारी.

गडचिरोली : कोनसरी गावातील 19 महिला रोजगार-स्वयंरोजगारासाठी हलक्या मोटार वाहन (एलएमव्ही) चालकाचे प्रशिक्षण घेणार आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) तर्फे त्यांना 45 दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे पाठवण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिने हे एक पाऊल असल्याचे मानले जाते.

प्रशिक्षणासाठी या महिलांना घेऊन जाणाऱ्या बसला लॅायड्स मेटल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवली. कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे आणि एलएमईएल तसेच एलआयसीएलचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी कोनसरी गावातील 19 महिलांना 45 दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी छिंदवाडा येथील अशोक लेलँडकडे घेऊन जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवली. (अधिक बातमी खाली वाचा)

प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संबोधित करताना, पावडे यांनी गावातील महिलांसाठी कौशल्य विकासाचा एक नवीन मार्ग उघडल्याबद्दल लॉयड्स मेटल्सचे आभार मानले. महिलांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उन्नतीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आयटीआय चामोर्शीच्या पहिल्या तुकडीचे ऑन-जॉब प्रशिक्षण सुरू

चामोर्शी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) 20 विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे कोनसरी येथील लॉयड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात ऑन-जॉब प्रशिक्षण सुरु झाले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळतील. त्यातून त्यांना संबंधित व्यवसायांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होण्यास मदत मिळेल.

एलआयसीएल आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑन-जॉब प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभागींना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायांमध्ये त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी ऑन-जॉब प्रशिक्षणाच्या संधीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे आवाहन केले.

ऑन-जॉब प्रशिक्षणाची दुसरी तुकडी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. एलएमईएलने गडचिरोली जिल्ह्यातील 35 सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पत्र पाठवून त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे.