गडचिरोली : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी सोमवारी गडचिरोलीत जेलभरो आंदोलन केले. शासनाविरोधात निदर्शने केल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्याच्या आवारात स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी ठाण्याचे आवार महिला कर्मचाऱ्यांनी भरून गेले होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमित सेवेत सामावून घ्या, वेतनश्रेणी आणि पेन्शन लागू करा अशा मुख्य मागण्यांसाठी राज्यभरात अंगणवाडीच्या महिला कर्मचारी संपावर आहेत. यामुळे जिल्हाभरातील अंगणवाड्यांमधून ३ ते ६ वयोगटातील मुलांना दिला जाणार आहार वाटप करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून अंगणवाड्यांना सेविका, मदतनिसांनी लावलेले कुलूप काही ठिकाणी गावकऱ्यांच्या समक्ष तोडल्याने या कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत आपले म्हणणे मांडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन करत लक्ष वेधले. त्यांना पो.निरीक्षक अरुण फेगडे व पोलिस पथकाने स्थानबद्ध केल्यानंतर आयटकचे देवराव चवडे, डॅा.महेश कोपुलवार यांच्या नेतृत्वात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.