गडचिरोली : राहुरी (अहिल्यानगर) येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठात 16 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या 44 व्या सबज्युनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात गडचिरोली जिल्हा मुलींच्या संघाने राज्यातून तृतीय स्थान पटकाविले. बुलढाणा, अहिल्यानगर, अकोला, मुंबई या संघांचा पराभव करत उपउपांत्य फेरी गाठणाऱ्या गडचिरोली संघाने अमरावती संघाचा सरळ सेटमध्ये पराभव केला. परंतु उपान्त्य सामन्यात पुणे संघाकडून थोडक्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नाशिक संघाचा पराभव करून तृतीय स्थान पटकावले.
या संघात संघनायक म्हणून सुप्रिया जुवारे, माधवी कळते, निधी जांभुळकर, राधिका मगरे, मोहिनी पिंपरखेडे, धानी बिसेन, कृतिका वासेकर, आलिया आंबटकर, लावण्या प्रेमलवार, श्रेया होळी या खेळाडूंचा समावेश होता.
या स्पर्धेमधून 24 ते 29 दरम्यान तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल येथे होणाऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेकरिता निधी जांभुळकर व राधिका मगरे व राखीव खेळाडू म्हणून मोहिनी पिंपळखडे यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच सीनियर राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात सुप्रिया जवारे हिची आधीच निवड झाली आहे. या सर्व खेळाडू स्थानिक शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गडचिरोलीच्या खेळाडू आहेत.
गडचिरोली मुलींच्या संघाच्या या विजयाबद्दल बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव तथा मुख्य प्रशिक्षक प्रा.ऋषिकांत पापडकर, प्रा.रूपाली पापडकर, शिवाजी हायस्कूल गडचिरोलीचे शारीरिक शिक्षक मनीष बानबले, प्रशिक्षक आशिष निजाम, सुभाष धंदरे, उमेश बोराडे, विनय कोवे, राष्ट्रीय पंच यश बुरांडे यांनी अभिनंदन केले आहे.