गडचिरोली : अर्धवेळ स्री परिचर संघटनेचा (सिटू) जिल्हा मेळावा गडचिरोलीच्या सेमाना देवस्थानच्या सभागृहात घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माकपाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूरचे अरुण भेलके उपस्थित होते.
या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड, सतीश दुडमलवार हे सुध्दा उपस्थित होते. सन 1962 पासून अर्धवेळ स्त्री परिचर म्हणून या महिलांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात फक्त 50 रुपये मासिक मानधनावर या महिला काम करत होत्या. काही वर्षानी तो वाढवून फक्त तीन हजार करण्यात आला. कामाचा प्रकार अर्धवेळ म्हणून जरी असला तरी पण रोज 8 ते 10 तास काम सदर महिलांना करावे लागत होते. अल्प मानधनावर काम करत असल्या तरी जनतेच्या आरोग्याची काळजी या महिला नेहमी घेत होत्या. कोरोनाकाळात या महिलांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना योध्दा म्हणून काम केले. पण कधी पाठ दाखवली नाही.
शासनाने मात्र यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही, असा आरोप मारकवार यांनी मेळाव्यात बोलताना केला. सिटू संघटनेच्या संघर्षामुळे मासिक मानधन 6 हजार करण्यात आले असले तरी ते पुरेसे नाही. सदर महिलांना अर्धवेळ न समजता पुर्णवेळ समजण्यात यावे, मासिक मानधन 20 हजार रुपये करण्यात यावे, 5 हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे, कोरोना काळातील कोरोना भत्ता देण्यात यावा, यासाठी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली संघर्ष सुरुच ठेवण्याचा निर्धार या मेळ्यावात घेण्यात आला.
मेळाव्यात अर्चना मारकवार, वैशाली शास्राकार, भाविका राऊत, ज्योती देवानंद दुर्गे, सुरेखा केळझरकर, साबेसा शेख, रेखा बंडावार, शामलता कुंभारे, रसिका मोहुर्ले, जया कन्नाके, अनिता नैताम, कुसुम चंदेल, देवला भैसा, रेवता सहारे, कुसुम मरसकोल्हे, निशा कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
































