Home महिला विश्व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

मा.खा.डॅा.नेते यांच्या हस्ते गौरव

गडचिरोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने महिला सन्मान व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवनेरी कॉलनी येथील मनीषा मडावी यांच्या निवासस्थानी मानवाधिकार संघटनेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना डॉ.नेते म्हणाले, स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधारवड नसून समाजाच्या प्रगतीला दिशा देणारी प्रेरणादायी शक्ती आहे. कधी शौर्याची ढाल तर कधी मायेची उबदार शाल बनून स्त्री कुटुंब आणि समाजाला बळ देत असते. इतिहासातील अनेक महान स्त्रियांनी आपल्या त्याग, धैर्य आणि नेतृत्वातून समाजाला नवी दिशा दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा महिलांचा सन्मान करत महिला भगिंनीसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. त्या प्रेरणेतून आजच्या महिलांनीही विविध क्षेत्रात पुढे येत समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी पत्रकारिता, गायन, योग, उद्योजकता तसेच सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामुळे उपस्थित महिलांमध्ये विशेष उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे नेते डॉ.भारत खटी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनिषा मडावी, जावेद शेख, तेजस्विनी भजे, राणी गोपशेट्टीवार, लता लाटकर, पुनम हेमके यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी रेखा डोळस, डॉ.भारत खटी आणि योगिता पिपरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे व समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असा संदेश त्यांनी दिला. प्रास्ताविक मनीषा मडावी, संचालन मानवाधिकार संघटनेच्या शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम यांनी, तर आभार ताई खेडेकर यांनी मानले.