लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यात गडचिरोली राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

पैसे मागितल्यास काय करावे? ऐका

गडचिरोली : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 8 हजार 415 महिलांनी या योजनेचे अर्ज भरले आहेत. संपूर्ण राज्याची तुलना केल्यास गडचिरोली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी दिली. दरम्यान या योजनेचे अर्ज भरण्यासाठी कोणी पैसे मागत असतील तर त्वरित त्यासंदर्भातील माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 3373 शहरी तर 1 लाख 5 हजार 42 अर्ज ग्रामीण भागातून प्राप्त झाले आहेत. यात 14 हजार 98 अर्ज ऑनलाईन तर 94 हजार 317 अर्ज ऑफलाईन, असे एकूण 1 लाख 8 हजार 415 अर्ज प्राप्त झाले आहेत.

अर्ज भरण्याच्या कामांना गती देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्यात 14, 15 आणि 16 जुलै रोजी आरमोरी, गडचिरोली आणि देसाईगंज येथे शिबिर होणार असल्याचे सीईओ आयुषी सिंह यांनी सांगितले.

सहायता कक्षाची स्थापना
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी पैशाची मागणी होत असल्यास तक्रार नोंदविण्यासाठी, तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाद्वारे जिल्हास्तरावर सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक 8999365915 आणि 8698361830 असा आहे. यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.