महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि पोषण वाटिकेचा शुभारंभ

महिलांसाठी वरदान- संध्या हेमके

देसाईगंज : राष्ट्रीय पोषण अभियान व स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण विभाग आणि पाथ संलग्नित सीएचआरआय आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिर तथा पोषण वाटिकेचा शुभारंभ देसाईगंज तालुक्यातील चिखली रिठ या गावात झाला.

गावातील अंगणवाडी क्रमांक ७ च्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गहाणे, पर्यवेक्षिका सोनकुसरे, शाईन प्रकल्प प्रमुख डॉ.अपूर्वा आकरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.सृष्टी पाटील, उपसरपंच वनमाला पुस्तोडे, मुख्याध्यापक विलास पुस्तोडे, मुख्याध्यापक हटवार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संध्या हेमके म्हणाल्या, सी.एच आर.आय.च्या सहकार्याने, चिखली डोंगरगाव ग्रामपंचायत व अंगणवाडीद्वारे विकसित केलेली पोषण वाटिका महिलांना वरदान ठरणार आहे. सर्वांनी या वाटिकेचा आदर्श घेऊन आपली परसबाग फुलवावी आणि कुपोषण, रक्ताक्षय होण्यापासून बचाव करावा. वैद्यकीय व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गहाणे यांनी पोषण वाटिका उपक्रमांचे कौतुक केले. आपल्या भाषणात त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहावे असे आवाहन केले. इतरांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी गरोदर माता व स्तनदा माता यांच्या हस्ते पोषण वाटिकेचे उदघाटन करून फळझाडे व भाजीपाला लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश वाघमारे यांनी, सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिकेत चहांदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदर्श अंगणवाडी सेविका कालिंदा भर्रे, मदतनीस रंजना मेश्राम, समुदाय आरोग्य अधिकारी हेमंत नाकाडे, आरोग्य सेविका माया सहारे, ग्रामस्थ दीपक भागडकर, किशोर मेश्राम, अविनाश मेश्राम, लोकमान मेश्राम, एटापल्ली तालुका समन्वयक तुषार हेटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.