रामनगरातील सभ्य महिलांना सहन करावा लागतो ‘त्या’ लोकांचा त्रास

माजी नगरसेविकेने केली पोलिसांकडे फिर्याद

गडचिरोली : शहरातील रामनगर वॅार्डातील महिला सध्या काही लोकांच्या अर्वाच्य भाषेतील बोलणे आणि भर चौकात उभे राहून दिल्या जाणाऱ्या घाणेरड्या शिव्या दररोज एेकाव्या लागत असल्याने त्रस्त झाल्या आहेत. ते लोक दारूच्या नशेत तर्र राहात असल्याने त्यांना आपण काय करत आहोत याचेही भान नसते. या भागात सहजपणे आणि खुलेआम विकल्या जात असलेल्या दारूमुळे दारूड्यांचा हा त्रास वाढला आहे. या प्रकाराने त्रासलेल्या काही महिलांनी माजी नगरसेविका वर्षा शेडमाके यांच्या नेतृत्वात एका दारू विक्रेत्या महिलेच्या घरातून चक्क दारूच्या बाटल्या पकडल्या. पोलिसांना पाचारण करून त्या जप्त करण्यात आल्या.

दारूड्यांच्या त्रासामुळे रामनगरातील सभ्य महिलांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. लहान मुलांवरही त्यांचा वाईट परिणाम होत असल्याने या भागातील महिलांनी दारू विक्रेत्यांना तंबी देऊन दारू विक्री थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर विक्रेत्यांची नावेही पोलिसांना दिली होती. पण पोलिसांच्याच आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याने कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर कंटाळलेल्या महिलांनी आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्ष तथा महिला भाजपच्या जिल्हा सचिव, माजी नगरसेविका वर्षा शेडमाके, दुर्गा मंडळाच्या अध्यक्ष हेमा डोंगे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिव सुषमा येवले यांच्या नेतृत्वात दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड मारली. यावेळी कांता गुरनुले हिच्या घरातून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

या कारवाईमुळे रामनगरातील महिलांना थोडा दिलासा मिळाला आहे. पण दारू विक्रेत्यांना पोलिसांनी पूर्णपणे आळा घालावा अशी मागणी रोहिणी उईके, वेणु उईके, निर्मला वड्डे, उषा ढोके, पुजा गेडाम, ललिता ब्राह्मणवाडे, विमल वड्डे, शालिनी शेंडे, पुष्पा मडावी, माया मडावी, पुष्पा कोवे, सुरेळ वल्ललवार, विजया खोब्रागडे, मंगला राजगडकर, कल्पना टिंगुसले, पुष्पा चौधरी, पिंकी मेश्राम आदी महिलांनी केली आहे.