आरमोरी विधानसभा क्षेत्रातील 55,847 बहिणींच्या खात्यात 3 हजार येणे सुरू

आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी

देसाईगंज : राज्यात महायुती सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे सुरू झाले आहे. या योजनेअंतर्गत शासनाने विधानसभा क्षेत्र स्तरावर निश्चित केलेल्या समिती रचनेनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कृष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 55 हजार 847 अर्ज मंजूर केले आहेत. त्यानुसार संबंधित महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे.

आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या देसाईगंज तालुक्यात 16278, आरमोरी तालुका 15188, कोरची तालुक्यात 8983, तर कुरखेडा तालुक्यातील 15898 अशा एकूण 56348 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपूर्ण व त्रुटी राहिलेले 444 अर्ज वगळता उर्वरित अर्ज मंजूर करण्यात आले. दि.14 ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींच्या बॅँक खात्यात 1500 प्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 40 हजार 525 महिला खातेदारांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आधीच 12 कोटी 15 लाख 75 हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही. याची काय कारणे काय असू शकतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.

बँकेत पैसे जमा न होण्याचे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पात्र असूनही ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांनी आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नसेल त्यांनी दि.31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला अर्ज दाखल करावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले आहे. राज्य शासनाने आरमोरी मतदार संघातील हजारो महिलांना आर्थिक सहाय्य केल्याबद्दल आमदार गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांचे आभार व्यक्त केले.