हालूरच्या महिलांनी केला गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव

लॉयड्स फाउंडेशनचा पुढाकार

एटापल्ली : तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी विशेषतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांनी व्यसनमुक्त जीवनातून प्रगती साधावी आणि निरोगी आयुष्य जगावे यासाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने (एलआयएफ) जनजागृती केली. त्यातून प्रेरणा घेऊन दारू सेवनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानांविरुद्ध महिलांनी ठाम भूमिका घेत हा ऐतिहासिक ठराव केला आहे.

दारूमुळे उद्भवणारे कौटुंबिक वाद, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अस्थिरता, वाहन दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या दारूच्या व्यसनाचे असे अनेक दुष्परिणाम लॅायड्स इन्फिनिट फाउंडेशनने गावकऱ्यांना सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन दारूच्या आहारी जाणाऱ्या आपल्या माणसांना यातून बाहेर काढण्याचा निश्चय हालूर गावातील महिलांनी केला. त्यांच्या सक्रिय भूमिकेला आणि दृढ निर्णयाला सर्व ग्रामस्थांकडून पाठिंबा मिळाला.

या सकारात्मक पुढाकारामुळे गावातील समग्र विकासाला चालना मिळेल, आरोग्य सुधारेल व सामाजिक सौहार्द वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दारूमुक्त गावाच्या दिशेने झालेला हा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रगतीशील आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या ठरावाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

यासाठी गावातील सरपंच अरुणा मधुकर सडमेक, गावाचे पाटील लच्चू हेडाऊ, भूमिया धनसू होडे, महिला मंडळ अध्यक्ष कलावती तिरकी, उपाध्यक्ष फुलसिना एक्का, सचिव बाली हेडो, नवरी हेडो, शांती कुड्येती, तानी हेडो, जमाता हेडो, गीता हेडो, चमेली मिंज, विमला किंडो, कलावती तिरकी, फुलवती टोप्पो, तेरेसा टोप्पो, सविता टोप्पो, सविता बडा, किलसीता रिका, सावित्री आत्राम, बाली आत्राम, अनिता मिंज, इर्पे आत्राम, प्रतिमा तिग्गा, संजना हेडो, रजनी हेडो, कुम्में हेडो, शिवानी गेडाम, ग्राम संपर्क केंद्राचे कर्मचारी किशोर गावडे यांनी पुढाकार घेतला आहे.

हालूरच्या महिला आणि ग्रामस्थांच्या सामूहिक भावनेने आणि दृढनिश्चयाने चांगल्या आणि निरोगी समाजासाठी परिवर्तनकारी बदल कसा घडवून आणता येऊ शकतो, याचे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांसाठी लॅायड्स इन्फिनिट फाउंडेशन ग्रामस्थांना नेहमीच प्रेरित करीत राहील आणि पाठिंबा देत राहील, असे एलआयएफकडून सांगण्यात आले.