एटापल्ली : कोणत्याही सोयीसुविधा नसलेलं, एटापल्ली तालुका मुख्यालयापासून दूर असलेलं घनदाट जंगलाने व्यापलेलं बिड्री हे तिचं गाव. अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त बिड्रीला जाण्यासाठी पक्का रस्ताही नाही. एवढेच काय पण आताच्या जमान्यात मुलभूत गरज वाटत असलेले मोबाईल कव्हरेजसुद्धा नाही. अशा गावात लहानपण घालवलेल्या अश्विनी अशोक दोनाडकर या युवतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. आता या दुर्गम गावातून मायानगरी मुंबईत कर सहायक म्हणून ती रुजू झाली. परिस्थितीचा बाऊ न करता मिळवलेल्या या यशाला सलाम म्हणून मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या गावी जाऊन तिचा सत्कार केला.
अश्विनीचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे. या गावात जायला पक्का रस्ता नसल्याने चिखल, माती आणि नाल्यातून वाट काढत जावे लागते. गावात ग्रामपंचायतसुद्धा नाही. बसची सोय तर दूर, मोबाईलचे कव्हरेजसुद्धा नाही. वीज पुरवठा आहे, पण तो कधी खंडीत होईल आणि परत कधी सुरू होईल याचा नेम नसतो. गावात केवळ सातव्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेचीशाळा आहे. पुढील शिक्षण अहेरी किंवा एटापल्लीत घ्यावे लागते. त्यासाठी अनेक वेळा बिड्री गावातून तालुक्याच्या ठिकाणी पैदलसुद्धा जाऊन शिक्षण घ्यावे लागते. ऊन, वारा, पाऊस अशा संकटांवर मात करीत अश्विनीने गडचिरोलीतील समाजकल्याणच्या वसतिगृहात प्रवेश मिळवून आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले.
फक्त जिद्द आणि चिकाटीच्या भरवशावर उच्चशिक्षण घेऊन यशाला गवसणी घालता येऊ शकते याची प्रचिती एटापल्ली तालुक्यातील बिड्री येथे गेल्यावर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आली. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या संकल्पनेतून बिड्री येथे पदाधिकारी पोहोचले. घरी जेमतेम दोन एकर शेती असलेले अशोक दोनाडकर मिस्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अश्विनीची लहान बहीणसुद्धा हलाखीच्या परिस्थितीतून बीएससीचे शिक्षण घेत आहे. तिला भविष्यात शिक्षिका व्हायचे आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने कोठरी येथील भंते भगीरथ यांच्या उपस्थितीत अश्विनीचा गावात सत्कार केला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश दुर्गे, युवा नेते हेमु नाकाडे, हर्षल वासेकर आदी उपस्थित होते. समाजातील इतर कुटुंबीयांना, युवक-युवतींना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी हा सत्कार केला जात असल्याचे यावेळी प्रणय खुणे यांनी सांगितले.