कोंढाळ्याच्या महिला सरपंचाला दिल्लीतील सोहळ्याचे निमंत्रण

स्वातंत्र्यदिनी उपस्थित राहणार

देसाईगंज : स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन सोहळ्यासाठी देशभरातील विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना दरवर्षी निमंत्रण दिले जाते. यावर्षी महाराष्ट्रायीतल 17 सरपंचांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून त्यात देसाईगंज तालुक्यातील कोंढाळाच्या सरपंच अपर्णा नितीन राऊत यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल. त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान कोंढाळाच्या सरपंच अपर्णा राऊत यांना मिळाल्याने त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

अपर्णा राऊत यांनी कोंढाळा ग्रामपंचायतअंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांना प्राधान्य देत स्वछ भारत मिशन, घरकुल योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ, हागणदारीमुक्त गाव, वृक्ष लागवड, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा, विधवा-निराधार महिलांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न, तरुणांसाठी अभ्यासिका, आरोग्य शिबिरे राबवून शेकडो नागरिकांना लाभ दिला. याशिवाय विविध मंत्रालयांमार्फत गावाच्या विकासासाठी निधी मिळवून त्यांनी गावाला नवी दिशा दिली आहे. गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज कोंढाळा गाव ‘यशवंत’ ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून दिल्लीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना मिळाले आहे.