प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे ‘त्या’ पोलीस युवतीने संपविले जीवन

कुटुंबियांची तक्रार, पुलापासून जवळच आढळला मृतदेह

आरमोरी : शहरापासून जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेणाऱ्या शारदा नामदेव खोब्रागडे या पोलीस शिपाई तरुणीचा अखेर शोधमोहिमेदरम्यान रात्री मृतदेह सापडला. कुटुंबियांनी शनिवारी आरमोरी पोलिसात केलेल्या तक्रारीत शारदाच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर जबाबदार असून प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आपले जीवन संपविल्याचा आरोप केला आहे. त्यादृष्टीने आरमोरी पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.

पोलीस पथक, तहसील कार्यालयाचे बचाव पथक आणि स्थानिक ढिवर बांधवांच्या मदतीने घेतलेल्या शोधमोहिमेत रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शारदाचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर आढळला.

मुळची सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असलेली शारदा भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत होती. ती अविवाहित असून सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याचे तिच्यावर प्रेम होते. परंतू त्या सहकाऱ्याच्या वागणुकीमुळे ती अस्वस्थ झाली होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. त्यामुळे काही दिवसांपासून ती सुटीवर आपल्या नातेवाईकांकडे गडचिरोलीला होती. शुक्रवारी दुपारी ती आपल्या गावी (आई-वडिलांकडे) जाण्यासाठी दुचाकीने निघाली होती, पण शिवणीला जाण्याआधीच दुपारी ४ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवरील पुलावर ती थांबली. मानसिक तणावात असतानाच तिने दुचाकी आणि मोबाईल पुलावर ठेवून नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.

शारदाशी संबंधित प्रेम प्रकरणाची आणि त्यातून तिला आलेल्या मानसिक तणावाची माहिती तिच्या कुटुंबियांनाही होती. त्यामुळे त्यांनी शारदाच्या प्रियकराविरूद्ध तक्रार देत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी शारदाचा मोबाईल जप्त केला असून संबंधित आरोपीवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.