तिरपा कटाक्ष / मनोज ताजने
अल्पवयीन तरुणी नकळत्या वयात आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच घडतात. काही दिवसात त्या परतही येतात, किंवा आई-वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून परत आणल्या जातात. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात या घटनांचे प्रमाण जास्त आहे. पण अलिकडे सुखवस्तू घरातील एखादी विवाहित महिला सोशल मीडियावर जुळणाऱ्या प्रेमात जबाबदारीचे भान विसरून चक्क आपला पती आणि मुलांचा त्याग करायला तयार होत असेल तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही.
गडचिरोलीसारख्या तुलनेने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागास असलेल्या जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत. त्यातील एक घटना तर अगदी ताजी आहे. कोणाची बदनामी टाळण्यासाठी अशा घटनांची वाच्यता होत नसली तरी अशा घटना आपल्या अवतीभोवती घडत असल्याने या विषयाकडे सर्वांनीच चौकसपणे पाहणे आणि योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
गडचिरोलीमधील एका अधिकाऱ्याची पत्नी गेल्या महिन्यात अचानक गायब झाली होती. तिच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी माग काढल्यानंतर तिला गुजरातच्या सुरत शहरातून ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर एका गुजराती व्यक्तीसोबत तिचे प्रेम जुळले होते. त्यातून ती पती आणि दोन मुलांचा त्याग करून प्रियकरासोबत पळून गेली होती. अशाच पद्धतीने यापूर्वीसुद्धा मूळची गडचिरोलीतील पण नंतर पतीच्या नोकरीनिमित्त मुंबईत गेलेली एक सुशिक्षित व सुस्वभावी महिला सोशल मीडियावरच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून राजस्थानमध्ये पळून गेली होती. पण तिला आपली चूक लक्षात आल्यानंतर ती माघारी फिरली. मात्र पती, मुलांच्या नजरेत आपण पडलो, हे लक्षात आल्यानंतर तिने लाजेखातर स्वत:ला संपवणे पसंत केले.
या दोन्ही घटनांमध्ये सोशल मीडियावर जुळलेले प्रेम हा एक समान धागा आहे. या महिलांना पती किंवा कुटुंबियांकडून प्रेम मिळत नव्हते का? म्हणजे त्यांना प्रेमाची भूक होती, की संस्कारांच्या कमतरतेमुळे त्यांना आपण काय करत आहे याचे भान नव्हते? असे प्रश्न या घटनांच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
समाजात नाहक बदनामी होईल म्हणून पोलीस विभागही अशा घटनांची वाच्यता करत नाही. पण आपले सर्वस्व सोडून एका परपुरूषासोबत जाण्याची हिंमत करताना तिला तर आपल्या सामाजिक बदनामीची काळजी वाटत नसेल, आपल्या पतीकडे लोक कोणत्या नजरेने पाहतील, आपल्या लेकरांचे भवितव्य काय असणार, याचाही विचार तिच्या मनात येत नसेल तर अशा बेजबाबदार, मनमौजी वागत असलेल्या महिलांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट कायद्याच्या तराजूत तोलणे शक्य नसते. झालेल्या चुकीसाठी कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षा मिळू शकते, मात्र त्यामुळे दुभंगलेली मनं आणि वातावरण निवळण्याऐवजी ते अधिक बिघडू शकते. त्यामुळे समुपदेशनातून मनपरिवर्तनाचाही पर्याय आहे. मात्र मुळात तशी वेळ येऊच नये याची दक्षता प्रत्येक कुटुंबाने घेण्याची गरज आहे. नंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग जडणार नाही याची खबरदारी घेणे जास्त गरजेचे आहे.
अशा घटनांसाठी सोशल मीडियाला जबाबदार धरून चालणार नाही. त्याचा चुकीचा वापर जो करतो, तोच त्यासाठी जबाबदार ठरतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला, मुलींवर प्रेमाचे जाळे टाकून त्यांची शिकार करणारी एखादी टोळी तर सक्रिय नाही ना, याचाही तपास पोलिस यंत्रणेने करणे गरजेचे झाले आहे.
प्रेमाला वेळ, वय नसते, प्रेम ही भावना खूप पवित्र आहे, असे एकदाचे मान्य करूया. पण दोन मुलांच्या मातेला पती, मुलंबाळं, संसारातील नाती यांच्याकडून मिळणारे प्रेम कमी पडते म्हणून ती परपुरूषाच्या प्रेमाला बळी पडते का, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. वास्तविक ती महिला कदाचित एखाद्या पुरूषाच्या किंवा तरुणाच्या प्रेमात पडत असली तरी समोरचा पुरूष तिच्यावर खरे प्रेम करण्याची शक्यता फारच धुसर असते. त्यामुळेच अशा महिलांचा काही दिवसात भ्रमनिरास होतो, आणि अपराधीपणाच्या भावनेसोबत जगण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणता मार्ग राहात नाही. त्यामुळे अशा तरुणी, महिलांनीच नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमेकांचा आदर करून घरातील वातावरण प्रेमळ ठेवल्यास कदाचित अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होऊ शकते, यात शंका नाही.