गडचिरोली : लग्नानंतर अवघ्या ३-४ महिन्यात पतीसह सासरच्या लोकांनी पैशासाठी सुरू केलेल्या छळामुळे एका विवाहितेने विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवत छळातून कायमची मुक्ती मिळवली. परंतू तिच्या या मृत्यूसाठी कारणीभूत असणारे तिचे पती, सासू-सासरे आणि घरातील इतर कुटुंबियांवर कोणतीही कारवाई करण्यास चामोर्शी पोलिस टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप मृत विवाहितेच्या आई-वडिलांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केली आहे.
प्राप्त तक्रारीनुसार, सावली (जि.चंद्रपूर) तालुक्यातील जनकापूर रिठ येथील उद्धव विठ्ठल वालदे यांची कन्या लिना हिचा विवाह दोन वर्षापूर्वी चामोर्शी येथील विरेंद्र गिरीधर उंदीरवाडे यांच्याशी झाला होता. पण लग्नानंतर ३ ते ४ महिन्यात जावयासह सासरच्या मंडळींनी लिना हिला माहेरून २० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला. यासोबत घरातील लहानलहान कारणांरून तिला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.
या छळाबद्दल लिना हिने फोनवरून तिच्या आईला अनेक वेळा सांगितले. पण घरांतील व्यक्तींमध्ये सुधारणा होईल म्हणून आई-वडील तिची समजूत घालून तिला आपल्या सासरी नांदण्यासाठी समजावत होते. १५ दिवसांपूर्वी लिना माहेरी असताना तिचा पती आला, त्यावेळी लिनाच्या वडीलांनी आपण आर्थिक स्थितीमुळे २० हजार रुपये देण्यास असमर्थ असल्याचे सांगत दोघांचीही समजूत घातली. पण तेथून १५ दिवसानंतर लिनाने विष घेऊन आत्महत्या केल्याची बातमी त्यांना एेकावी लागली.
पुरावे असताना कारवाई का नाही?
लिनाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी आई-वडिलांनी मुलीच्या संशयास्पद मृत्यूबद्दल चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शवविच्छेदन अहवालातही विषबाधेने मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. तरीही लिनाच्या सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याबद्दल उद्धव वालदे यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे.