गडचिरोली : परिसरातील 20 ते 25 गावांचा समावेश असलेल्या गडचिरोली तालुक्यातील पोटेगावच्या सेतू केंद्रात गरीबाची लुटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी भरल्या जाणाऱ्या आॅफलाईन अर्जासाठी 20 रुपये घेतले जातात. याशिवाय अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी वेगळे पैसे घेतले जात असल्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेण्यासाठी हा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गरिबांची कामे सहज आणि कमी खर्चात होण्यासाठी शासनाने गडचिरोली तहसील कार्यालयाकडून पोटेगाव येथे सेतू केंद्र देण्यात आले. यासंदर्भात दिवाकर सैनु हिचामी रा.जलेर यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॅार्म घेण्याकरिता पोटेगावच्या सेतु केंद्रात गेले असता त्यांना एका फॅार्मसाठी 20 रुपये दर असल्याचे सांगण्यात आले. झेरॅाक्स काढायची असेल तर 10 रूपये प्रतिझेरॅाक्स असा दर आकारला जातो. पर्याय नसल्याने लोक हे पैसे देतात. पण एक रुपयाचाही खर्च येणार नाही, हा प्रशासनाचा दावा फोल ठरत आहे.
काही नागरिकांनी यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे तोंडी तक्रारी केल्या, त्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.