केवळ अनुदानाच्या योजना देण्यापेक्षा राज्यात महिलांना सुरक्षित वातावरण द्या

राष्ट्रवादी (एसपी) महिला काँग्रेसची मागणी

गडचिरोली : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दैनंदिन महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली आहे. बदलापूर येथील साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने केलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) गडचिरोली शहराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून निषेध नोंदविण्यात आला. महिलांना अनुदानाच्या योजना देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घ्या, आणि कठोरात कठोर कायदा बनवून महिलांना सुरक्षित वातावरण द्या, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या गडचिरोली शहर अध्यक्ष प्रीती कोवे (राऊत), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, जिल्हा उपाध्यक्ष विमल भोयर, मिनल चिमूरकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या ऋतुजा कन्नाके, पोर्लाच्या सरपंच निवृत्ता राऊत, ज्येष्ठ कार्यकर्त्या शुभांगी सोनुले यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष संगीता राऊत यांच्या मार्गदर्शनात हे निवेदन देण्यात आले.