गडचिरोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी नवीन वेबसाईट (वेब पोर्टल) सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ अॅपवरून अर्ज भरण्याची सोय असलेल्या या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान झाली आहे. त्यामुळे संकेतस्थळावरून लवकरात लवकर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
या योजनेसाठी 31 जुलैअखेर 1 लाख 52 हजार 327 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 37 हजार 564 अर्ज मंजूर झाले असून 1 लाख 11 हजार 692 अर्ज तपासणीमध्ये आहेत. 95 अर्ज नामंजूर झाले आहेत. 3564 अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आले आहेत. अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी लाभार्थी महिलांना मोबाईवर संदेश पाठविण्यात येत आहेत. या माध्यमातून संबंधित महिलांना आवश्यक त्रुटीची पुर्तता करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही संधी एकच वेळ मिळणार असल्याने त्रुटीची पुर्तता काळजीपुर्वक करावी.
कसे भराल साईटवर अर्ज?
ज्या इच्छुक व पात्र लाभार्थीनी अद्याप अर्ज भरले नाही त्यांनी https://ladakibahin. maharashtra.gov.in/ signup या संकेतस्थळावर जाऊन क्रिएट अकांउंटवर क्लिक करून आपले अर्ज भरावेत. ज्यांना स्वत: अर्ज भरणे जमणार नाही त्यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ ग्रामीण/ आदिवासी), ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, नगरपालिका/ नगरपंचायतीचे मदत केंद्र, अशा वर्कर, बचत गटाच्या समुहसाधन व्यक्ती या शासनाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून / केंद्रावरून अर्ज भरून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांनी नारीशक्तिदूत या ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी मोफत असल्याने त्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये, असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.