राष्ट्रपतींच्या हस्ते आशा बावणे यांचा फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव

निस्वार्थ आरोग्य सेवेसाठी सन्मान

गडचिरोली : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या देशातील 15 परिचारिका आणि परिचरांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला. यात गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत असलेल्या आशा बावणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावर्षी हा सन्मान मिळालेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव आहे.

28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल बावणे यांना सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी संजय दैने आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांनी आशा बावणे यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले.

आशा बावणे यापूर्वी चंद्रपूर व त्यापूर्वी गडचिरोली येथेच परिचारिका पदावर कार्यरत होत्या. चंद्रपूर येथे कार्यरत असतानाच त्यांचे नामांकन राष्ट्रपती पुरस्कारासाठी करण्यात आले होते. त्‍यांनी विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्य सेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या लसीकरण मोहिमेचे विशेष कौतुक झाले.

दिल्ली येथील या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.