
गडचिरोली : “मुळांशी नाते, संस्कृतीशी निष्ठा” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत शनिवारी (दि. 17) प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डिजिटल युगाच्या प्रवाहात हरवत चाललेले लंगडी, गिल्ली-दांडा आणि लगोरी यासारख्या देशी खेळांनी शाळेचे मैदान दुमदुमले. विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सहचारिणी अपूर्वा श्लोक, अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या सहचारिणी सरण्य रमेश, तसेच शाळेच्या संचालिका अझिमा हुड्डा, प्राचार्य रहीम अमलानी, शैक्षणिक प्रमुख अमीन नुराणी आणि मुख्याध्यापिका समिरा लाखानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी हळदी-कुंकू समारंभ, उखाणे आणि आकर्षक रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आकाशात झेप घेणाऱ्या रंगीबेरंगी पतंगांनी ‘आनंद आणि एकता’ हा संदेश दिला.
विविध देशी खेळांमध्ये रमल्या महिला
आजच्या पिढीला भारतीय मातीतील खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने फुगडी, भोवरा, मडके फोड, दोरी खेच, स्लो सायकल रेस, कंचे, दोरी उड्या , पतंग उडविने यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी उडविलेल्या रंगी-बेरंगी पतंगांमुळे आसमंत रंगीबेरंगी दिसत होता. या खेळांमध्ये विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालकांनी या पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
आज मुलांसोबत खेळताना आम्ही आमचे बालपण पुन्हा जगलो, असे कार्यक्रम शाळेने नेहमी घ्यावेत, अशा भावनिक प्रतिक्रिया पालकांनी यावेळी व्यक्त केल्या. सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरली ती ‘डबा पार्टी’. जात, धर्म, पंथ विसरून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी एकत्र बसून घरगुती भोजनाचा आस्वाद घेतला. एकमेकांना आनंदाने घास भरविला. या माध्यमातून आपुलकी , सामाजिक प्रेम, आणि संवाद वाढण्यास मदत झाली. भोजनानंतर आयोजित पालक-शिक्षक सभेत (PTM) मुलांच्या सर्वांगीण प्रगतीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
संस्कार आणि आधुनिक शिक्षणाचा मेळ
“प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल ज्या पद्धतीने संस्कार आणि आधुनिक शिक्षणाचा मेळ घालत आहे, ते कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळेच आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचते.” असे उद्गार कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अपूर्वा श्लोक व सरण्य रमेश यांनी काढले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होणे गरजेचे आहे, ते पारंपरिक खेळांमुळे साध्य होते. बरेचसे विद्यार्थी मोबाईलवरील गेम खेळण्यात मग्न असतात, जर त्यांना असे पारंपरिक खेळ खेळण्यास प्रवृत्त केले तर त्यांचे आरोग्य सुधारून ते स्वस्थ राहतील, असा संदेश संस्थेचे महासचिव अझिझ नाथानी यांनी दिला.
प्राचार्य रहीम अमलानी यांनी “शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कार घडवणारी पवित्र जागा आहे,” संस्कृतीशी नाते जोडूनच शिक्षण अर्थपूर्ण बनते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन समरीन बोरकर, निलिमा वाटेकर व शोभा त्रिपाठी यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य पारस गुंडावार, समन्वयक नयना दरडमारे, रोजिना बुधवानी व सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
































