गडचिरोली : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात येत्या शुक्रवारी (दि.20) जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर महिलांविषयीच्या तक्रारींची सुनावणी घेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता होणाऱ्या या जनसुनावणीस महिलांनी न घाबरता पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष गडचिरोली जिल्हयात येणार आहे. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनसुनावणीनंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनिशी येत आहे. जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित राहणार असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे.
यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करणार आहे. आढावा बैठकीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न, योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येतात.
































