अहेरी : केंद्रवर्ती अर्थसंकल्प 2022-23 अंतर्गत अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी, मुलचेरा आणि सिरोंचा तालुक्यातील आदिवासी भगिनींकरिता तब्बल ८५ ते १०० टक्के अनुदानावर शिलाई मशिनचे वाटप केले जाणार आहे. ईच्छुक आदिवासी महिलांनी 10 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत 133 आदिवासी भगिनींना घरी बसून टू इन वन शिवणयंत्र चालवून उदरनिर्वाह करता यावा, याकरिता हे अनुदानित शिवणयंत्र वाटप केले जाणार आहे. त्यासाठी 18 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. माडिया समाजातील महिलांसाठी प्रतिलाभार्थी 15 हजार, तर बिगर माडिया महिलांसाठी 12 हजार 750 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, बँकेचे पासबुक (आधार लिंक केलेले), सातबारा दाखला, योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.