उपेक्षित एकल महिलांना दिले आत्मसन्मानाचे ‘हळदीकुंकू’

प्रशासनासह ‘उमेद’चा पुढाकार

महिला बचत गटांंना एक लाखाचे धनादेश देताना सीईओ गाडे, अति.सीईओ भुयार आदी.

गडचिरोली : समाजातील रूढी-परंपरांमुळे अनेकदा उपेक्षित ठरणाऱ्या एकल, विधवा व परित्यक्त्या महिलांना सन्मानाचे स्थान देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘हळदीकुंकू’ उपक्रमाच्या माध्यमातून एक नवे सामाजिक पर्व सुरू केले आहे. सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम महिलांच्या सर्वांगिण सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा ठरला आहे.

सामान्यतः ज्या महिलांना समाज हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवतो, अशा एकल महिलांसाठी शासनाने जाणीवपूर्वक जिल्हाभर हळदीकुंकू मेळाव्यांचे आयोजन करून त्यांच्या आत्मसन्मानाला नवे बळ दिले आहे. या माध्यमातून सण-उत्सवांच्या आनंदात त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

एकाच छताखाली सर्व विभागांचा समन्वय

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग, महसूल प्रशासन, शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या प्रभावी समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. सामाजिक परिवर्तनासोबतच एकल महिलांचा आत्मसन्मान व आर्थिक स्वावलंबन वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

25,732 एकल महिलांना विविध लाभ

जिल्हा परिषदेने नुकत्याच केलेल्या विशेष सर्वेक्षणानुसार, गडचिरोली जिल्ह्यात एकूण 25,732 एकल महिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने सुनियोजित कृती आराखडा राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये विविध प्रकारची शासकीय कागदपत्रे (जसे आधार कार्ड, मतदार यादीत नाव नोंदणी, बँक खाते उघडणे, जात प्रमाणपत्र), आर्थिक सक्षमीकरण (उमेद अभियानांतर्गत कार्यभांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आणि बँक लिंकेजद्वारे स्वयंरोजगारासाठी सहाय्य), सामाजिक सुरक्षा (संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व अपंग व्यक्ती कल्याण योजनांचा लाभ), आरोग्य व निवारा (आयुष्यमान भारत कार्ड व प्रधानमंत्री आवास/घरकुल योजनेत प्राधान्य), बालसंगोपन (एकल महिलांच्या 18 वर्षांखालील मुलांसाठी बालसंगोपन योजनेचा आधार) आदींचा लाभ दिला जात आहे.

प्रत्येक तालुका व प्रभागस्तरावर मेळावे

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना लेखी निर्देश देऊन प्रत्येक तालुका व जिल्हा परिषदेच्या 51 प्रभाग स्तरावर एकल महिलांसाठी रोजगार व सक्षमीकरण मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या महिलांकडे आवश्यक शासकीय कागदपत्रांची कमतरता आहे, ती तातडीने पूर्ण करून देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. एकही एकल महिला शासकीय लाभांपासून वंचित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मेळाव्यात धनादेशांचे वाटप व मार्गदर्शन

गडचिरोलीतील समाजकल्याण सभागृहात झालेल्या गडचिरोली तालुक्यातील मेळाव्यात स्मिता चौधरी, बहिणाबाई आत्राम, विमल मडावी आणि शशिकला दुमाने या एकल महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले, “आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्वावलंबन हे सक्षमीकरणाचे प्रमुख स्तंभ आहेत. महिलांनी घरगुती जबाबदाऱ्यांसोबतच स्वयंरोजगार व उद्योगाकडेही वळावे. तसेच आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. बार्टी आणि सारथी सारख्या विविध शासकीय व संस्थात्मक माध्यमांतून उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेऊन प्रगती साधावी”, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक राहुल काळभोर, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, प्रफुल्ल भोपये, भारतभूषण धुर्वे व कविता गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.